अमरावती – अमरावती पोलिसांनी एक मोठी कारवाई करत तब्बल 10 किलो सोने आणि 5 लाखांहून अधिक रोकड जप्त केली आहे. या प्रकरणी तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आला असून हा मुद्देमाल हवालाचा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजापेठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्यासह पथकाने बडनेरा मार्गावरील एका इमारतीवर धाड टाकली असता, फ्लॅट क्रमांक 401 मध्ये राजेंद्र सिंग भंवरसिंग राव, गिरीराज सोनी आणि अशोक खंडेलवाल हे तीन इसम आढळून आले.
या तिघांकडून पोलिसांनी सुमारे 10 किलो सोन्याचे दागिने आणि बिस्कीट ज्याची अंदाजे किंमत पाच कोटी रुपये असून 5 लाख 39 हजारांची रोख रक्कम जप्त केली. याशिवाय याठिकाणी हिशोबाच्या काही कच्च्या पावत्यादेखील जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या संपूर्ण मुद्देमालाबाबत संबंधित इसमांना विचारले असता त्यांनी कुठलेही समाधानकारक उत्तर न दिल्याने पोलिसांनी हा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. सदर अपार्टमेंट हे रहिवाशी क्षेत्र असून या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं ठेवण्यासाठी मनपाच्या बाजार परवाना विभागाची कुठलीही परवानगी संबंधित इसमांकडे नसल्याची माहिती आहे. त्यामुळे हा संपूर्ण व्यवहार संशयास्पद दिसत असून हे सोनं आणि पैसे हवाला रॅकेटचा एक भाग आहे का? या अनुषंगाने अमरावती पोलीस पुढील तपास करीत आहेत.