अक्षय्यतृतीयेला झळाळणार सोने

खरेदीचा दिवस ः दर उतरल्याने सुवर्णखरेदीची “सुवर्णसंधी’

अक्षय्यतृतीयेचे सोने नेहमीच फलदायी

गेल्या वीस वर्षांचे दर पाहिल्यास सोन्याच्या दरात सातत्याने वाढ झाली आहे. वीस वर्षांपूर्वी अक्षयतृतीयेच्या दिवशी म्हणजेच 28 एप्रिल 1998 रोजी सोन्याचा दर 4025 रुपये प्रति तोळा (दहा ग्रॅम) इतका होता. पुढील आठ वर्षातच म्हणजे 2006 च्या अक्षयतृतीयेला सोन्याचा दर 9520 रुपये प्रति तोळ्यावर जाऊन पोहचला. दोनच वर्षांत अर्थात 2008 सालच्या अक्षयतृततीयेला सोन्याने 11 हजाराचा टप्पा ओलांडला. यानंतर सातत्याने सोन्याच्या दरात वाढच होत राहिली. गेल्या वीस वर्षांमध्ये अक्षयतृतीयेला गतवेळच्या अक्षयतृतीयेच्या तुलनेत सोन्याचा दर केवळ दोनदाच कमी झाला आहे. खऱ्या अर्थाने अक्षयतृतीयेला खरेदी केलेले सोने अक्षय्य ठरले. गेल्या वर्षी अक्षयतृतीयेला सोन्याचा दर 29620 रुपये प्रति तोळा होता तो यावर्षी थेट 32 हजारांपर्यंत पोहचला आहे. 2010 साली 18 हजारांवर असलेल्या सोन्याने अवघ्या आठ वर्षांमध्ये 32 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या सोन्याचे दर काही प्रमाणात उतरले असले तरी याच वर्षीच्या फेब्रुवारीच्या महिन्यात सोन्याने 34 हजारांचा आकडा ओलांडला होता, त्यामुळे पुढे दर वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

पिंपरी – अक्षय तृतीया या सणाचे हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यात सोन्याचे दर सध्या गेल्या सहा महिन्यांतील निचांकी पातळीवर असल्याने अक्षयतृतीयेचा मुहूर्त सोने खरेदी करणारांसाठी सुवर्णसंधी ठरणार असल्याने उद्याच्या दिवशी सोने खरेदीचा उच्चांक होईल, असा आशावाद व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.
अक्षय अर्थात कधीही क्षय न होणारे यामुळे या दिवशी सोने-चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे. यामुळे सराफा व्यावसायिकांनी अक्षय तृतीयेच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. यावर्षी अक्षयतृतीयेपूर्वी सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले असल्याने मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची शक्‍यता आहे. सध्या सोन्याचा दर हा गेल्या सहा महिन्यांमधील सर्वांत खालच्या स्तरावर आला आहे.

यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने देखील सोने खरेदीची ही सुवर्णसंधी असल्याचे व्यावसायिक सांगत आहेत. अर्थव्यवस्था आणि उद्योगांच्या बाबतीत सशक्‍त मानल्या जाणाऱ्या देशांमध्ये देखील सध्याची परिस्थिती म्हणावी तेवढी बरी नाही. देशात देखील निवडणुका सुरू असल्याने कोणते आणि कसे सरकार येईल? याबाबत साशंकता आहे. यामुळे शेअर्स व इतर ठिकाणी गुंतवणूक करण्याऐवजी सोने हाच सर्वोत्तम पर्याय सध्या तरी मानला जात आहे

दर वाढण्याची शक्‍यता
सोन्याची गेल्या दहा वर्षांतील दरवाढ पाहता भविष्यात सोन्याचे दर आणखी वाढतील याबाबत शंका नाही. सध्या दर कमी असल्याने अक्षयतृतीयेला सोन्याच्या विक्रीतही वाढ होण्याची शक्‍यता आहे. तज्ज्ञांच्या मते यावर्षी 15 ते 20 टक्‍क्‍याने विक्रीत वाढ होऊ शकते. सोन्यामध्ये असणाऱ्या उच्च लवचिकता, विद्युत वहन क्षमता, सौम्यता असे काही अद्वितीय गुण आहेत. यामुळे मोबाईल, जीपीएस, संगणक प्रणाली, वैद्यकीय उपकरणे, सर्किट बोर्ड अशा कित्येक औद्योगिक उत्पादनांमध्ये सोन्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. येत्या काही काळात औद्योगिक मागणी वाढण्याचीही शक्‍यता असल्याने सोन्याचे दर वाढण्याची शक्‍यता सराफा व्यावसायिक व्यक्‍त करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.