मॉस्को – सचोटीच्या मार्गाने नौकरी, व्यवसाय करणारे आपल्या गरजा जेमतेम पूर्ण करत आयुष्य जगतात. त्यात कोणी थोडे डोके वापरून जगले तर थोडा जास्तीचा पैसाही मिळवता येतो. मात्र भ्रष्ट आणि अनितीच्या मार्गाने भरपूर पैसा कमावता येतो.
त्या मार्गावरून जाणाऱ्यांचा शेवट शेवटी तुरूंगातच होतो. मात्र दरम्यानच्या या काळात या गैरमार्गाने मिळवलेल्या पैशाचा हे लोक कसा आणि काय उपयोग करतात ते पाहिल्यावर डोके गरगरते. रशियात नुकताच असाच एक प्रकार समोर आला आहे.
यात भ्रष्ट मार्गाने पैसे कमावणाऱ्या एका महाभागाने घरात चक्क सोन्याचे टॉयलेट तयार केले होते. ही व्यक्ती पोलीस अधिकारी असून ट्रॅफिक विभागात कार्यरत होती. त्याला अटक केल्यावर जेव्हा त्याच्या घराची झडती घेण्यात आली तेव्हा तपास अधिकाऱ्यांना भोवळ यायचेच फक्त राहीले होते.
ऍलेक्सी सफोनोव असे त्याचे नाव. त्याला आणि अन्य सहा जणांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली. ऍलेक्सीच्या घराच्या झडतीत त्याने अंतर्गत सजावटीसाठी लाखो रूपये खर्च केल्याचे आढळून आले. इतकेच काय त्याने टॉयलेटही सोन्याचे बनवले होते.