Gold-Silver Rates: दिल्ली सराफात सोमवारी चांदीच्या दरात 3,500 रुपयांची वाढ होऊन तो 2.50 लाख रुपये प्रति किलो झाला. ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या माहीतीनुसार, 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव 200 रुपयांनी वाढून 1,56,100 रुपये प्रति 10 ग्रॅम (सर्व करांसहित) झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटीज विभागाचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी म्हणाले, जागतिक बाजारातील संमिश्र संकेत आले. त्यांनी पुढे सांगितले की, अमेरिका-इराण संबंधांमधील अनिश्चिततेमुळे, राजनैतिक प्रयत्नांमध्ये मर्यादित प्रगती आणि पुन्हा चर्चा सुरू करण्यासाठी कोणतीही स्पष्ट कालमर्यादा नसल्यामुळे बाजारातील भावना सावध राहिली आहे. ज्यामुळे कमोडिटीज आणि वित्तीय बाजारांमध्ये भू-राजकीय जोखमीचा प्रीमियम कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये, स्पॉट सोने आणि चांदी दोन्ही अनुक्रमे प्रति औंस 4,704 अमेरिकी डॉलर आणि 75.60 अमेरिकी डॉलरवर किंचित घसरणीसह व्यवहार करत होते. अमेरिका-इराण चर्चा थांबल्याने स्पॉट सोन्याच्या किमती घसरल्या. तेलाच्या किमती वाढल्या आणि महागाईची चिंता वाढली, असे मिराई असेट शेअरखानचे कमोडिटीज प्रमुख प्रवीण सिंग म्हणाले. इराणने अमेरिकेला होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यासाठी आणि संघर्ष संपवण्यासाठी एक नवीन प्रस्ताव दिला. या प्रस्तावामध्ये अणु वाटाघाटी स्थगित करण्याचाही समावेश आहे.