नवी दिल्ली – लग्न सराईत सोन्याच्या वाढत्या किंमतीला आज पुन्हा ब्रेक लागला आहे. बुधवारी सोन्याचे दर 105 रुपयांनी घसरून 56 हजार 526 रुपये प्रती 10 ग्रॅम झाला आहे. दरम्यान, मंगळवारीही दरात 130 रुपयांची घट झाली होती. दुसरीकडे चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
दिल्ली सराफात आज सोन्याचा दर 56 हजार 526 प्रती दहा ग्रॅम झाला आहे. येत्या काळात सोन्याचे दर 64 हजारवर पोहोचतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. चांदीचे दर मात्र वधारले आहेत. चांदीच्या दरात 52 रुपयांनी वाढ होउन हा दर 69 हजार 694 रुपये प्रती किलोवर पोहोचले आहेत. बुधवारी सकाळपासून चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली.
एचडीएफसी सिक्युरिटीजच्या विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत सोन्याचा स्पॉट भाव 105 रुपयांनी घसरून 56,526 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
मंगळवारी डॉलर निर्देशांक 0.18 टक्क्यांनी मजबूत झाल्याने सोन्याच्या किमतींवर दबाव असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. अमेरिकेच्या रोख्यांची कमाईही अलीकडच्या नीचांकी पातळीवरून सावरली आहे.