Gold Silver Rates: सोन्याने विक्रमी दर गाठला; जाणून घ्या आजचा 10 ग्रामचा भाव

नवी दिल्ली – वाढलेले व्यापार युद्ध आणि घसरत असलेल्या डॉलरमुळे जागतिक पातळीवर सोन्याचे मागणी एकतर्फी वाढत आहेत. अशा परिस्थितीत मंगळवारी सोन्याचा दर पुन्हा पाचशे रुपयांनी वाढून 91 हजार 250 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. अखिल भारतीय सराफा संघटनेने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी चांदीचा दर मात्र 1 लाख 2,500 रुपये या पातळीवर स्थिर राहिला. चांदीचा दर अगोदरच विक्रमी पातळीवर आहे आणि सोन्याचा दर विक्रमी पातळीवर आहेकूच करीत आहे.
एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार धोरण, अमेरिकेत मंदी निर्माण होण्याची शक्यता आणि विविध देशांदरम्यानच्या संघर्षामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढत आहे. त्याचबरोबर डॉलर कमकुवत होत असल्यामुळेही सोन्याची मागणी वाढली आहे.
दरम्यान अमेरिकेतील महागाई कमी झाल्यामुळे व्याजदर कपातीची शक्यता काही गुंतवणूकदारांना वाटत असल्यामुळे सोन्याची मागणी आणखी वाढली आहे. देशातील वायदेबाजाराबरोबरच जागतिक वायदे बाजारातही सोन्याचा दर सध्या 3,000 डॉलरच्या पुढे आहे. यामुळे मध्यम ते दीर्घ पल्ल्यात सोन्याचे दर वाढत राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आता गुंतवणूकदारांचे लक्ष बुधवारी जाहीर होणार्या अमेरिकेच्या पतधोरणाकडे लागले आहेत.




