नवी दिल्ली- जागतिक बाजारात आज सोने आणि चांदीचे दर वाढले. त्या प्रमाणात भारतीय बाजारातही सोने आणि चांदीच्या दरात भक्कम वाढ झाली असल्याचे दिसून येते. दिल्ली सराफात सोन्याचा दर 416 रुपयांनी वाढून 50,802 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 1,014 रुपयांनी वाढून तयार चांदीचा दर दिल्ली सराफात 61,343 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,850 डॉलर व चांदीचा दर 21.90 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. अमेरिकेने व्याज दरात मोठ्या प्रमाणात वाढ केल्यानंतर आणि अमेरिकेमध्ये महागाई वाढल्याची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर जागतिक बाजारात बऱ्याच गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदी खरेदी केली आहे.
त्याचबरोबर जागतिक वायदे बाजारात सोने आणि चांदीचे दर वाढले आहेत. त्या प्रमाणामध्ये स्पॉट मार्केटमध्ये सोने आणि चांदीचे दर वाढत असल्याचे दिसून येत आहे, असे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.
रशिया – युक्रेन युध्द लांबल्यामुळ सोने आणि चांदीच्या दरामध्ये वाढ होण्यास चालना मिळत असल्याचे वातावरण आहे. युद्ध संपल्यानंतर किंवा संपण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर या दोन धातूचे दर एका विशिष्ट पातळीवर स्थिर होऊ शकतील असे विश्लेषकांना वाटते.