नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली. त्या तुलनेत भारतीय सराफात या दोन धातूंचे दर वाढले. काल सोने आणि चांदीच्या दरात घट झाली होती. दिल्ली सराफात सोन्याचा दर 487 रुपयांनी वाढून 52,266 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 426 रुपयांनी वाढून 58,806 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,774 डॉलर आणि चांदीचा दर 20.12 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता.
एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की डॉलरचा भाव काही प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे सोने आणि चांदीचे दर जागतिक बाजारात वाढले. भारतात रुपयाचे मूल्य कमी झाले आहे. त्यामुळे भारतामध्ये सोने आणि चांदीचे दर वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अमेरिकेची व्याजदर वाढ जागतिक महागाई , रशिया- युक्रेन युद्ध, चीन- अमेरिका तणाव या कारणामुळे इतर बाजाराबरोबरच सोने आणि चांदीच्या बाजारामध्ये अस्थिरता राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.