नवी दिल्ली – अखिल भारतीय सराफा संघटनेने जारी केलेल्या माहितीनुसार दिल्ली सराफात सोन्याचा दर 620 रुपयांनी वाढून 80,400 रुपये प्रति दहा ग्रॅम या तीन आठवड्याच्या उच्चांकी पातळीवर गेला. तयार चांदीचा दर 1,450 रुपयांनी वाढून 96,300 रुपये प्रति किलो या एक महिन्याच्या उच्चांकी पातळीवर गेला आहे.
जागतिक बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे. त्याचबरोबर देशातील व्यापार्यांनी लग्नसराई ध्यानात घेऊन सोने खरेदी वाढविली आहे. त्यामुळे या दोन धातूच्या दरात वाढ होत असल्याचे काही व्यापार्यांनी सांगितले.
जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून पुन्हा 2,700 डॉलर या पातळीवर गेला. अमेरिकेची अर्थव्यवस्था डोनाल्ड ट्रम्प म्हणतात तितकी खराब नाही. अमेरिकेच्या स्थूल अर्थव्यवस्थेची आकडेवारी कमालीची सकारात्मक असल्याचे मत विश्लेषक व्यक्त करीत आहेत.
या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या पत धोरण समितीची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे.
ही समिती पुन्हा व्याजदरात पाव टक्के कपात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भांडवल सुलभता वाढून महागाई वाढेल. शिवाय रशिया- युक्रेन आणि इस्त्रायल मधील संघर्ष वाढला आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी वाढविली आहे.
त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. एकूण परिस्थिती पाहता लघु ते मध्यम पल्ल्यास सोन्याचे दर सध्याच्या उच्च पातळीवर कायम राहण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली. अमेरिका व्याजदर कपात करणार हे गृहीत धरले जात असल्यामुळेही सोन्याचे मागणी वाढली असल्याचे सांगण्यात येते.