नवी दिल्ली -वाढत्या करोना रुग्नाचा सर्वच बाजारावर परिणाम होत आहे. सोने आणि चांदीचे दरही कमालीचे अस्थिर आहेत. शुक्रवारी दिल्ली सराफात सोने आणि चांदीच्या दरात घट नोंदली गेली.
सोन्याचा दर 24 रुपयांनी कमी होऊन 47,273 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर चांदीचा दर 909 रुपयांनी कमी होऊन 68,062 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात मात्र सोन्याचे दर वाढले. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,784 डॉलर व चांदीचा दर 26.05 डॉलर प्रति औंस झाला. या परिस्थितीचे विश्लेषण करताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक बाजारात जरी सोन्याचे दर वाढले तरी भारतीय बाजारात मात्र त्याचा परिणाम जाणवला नाही.
सध्या सोन्याचे दर तुलनेने कमी पातळीवर असल्यामुळे दीर्घ पल्ल्याचा विचार करून गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे असे बरेच विश्लेषक सुचवितात. केवळ आठ महिन्यापुर्वी भारतात सोन्याचे दर 58 हजार रुपयापर्यंत वाढले होते. मात्र नंतर आर्थिक परिस्थिती सुधारू लागल्यानंतर सोन्याच्या दरात मोठया प्रमाणात घट झाली होती.