नवी दिल्ली – अमेरिकेच्या अध्यक्षपदावर डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यापासून विविध वित्तीय उत्पादनावर याचे वेगवेगळे परिणाम होत आहेत. डॉलर कमालीचा बळकट झाल्यामुळे आणि अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत असल्यामुळे या दोन क्षेत्राकडे जागतिक गुंतवणूक वळत आहे. अशा परिस्थितीत सोने आणि चांदीकडे गुंतवणूकदारांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे या दोन धातूच्या दरात या आठवड्यात मोठ्या प्रमाणात घट झाली.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 700 रुपयांनी कोसळून 77,050 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 2,310 रुपयांनी कोसळून 90,190 रुपये प्रतीक किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात या दोन धातूला मागणी कमी झाल्यामुळे या दोन धातूचे दर स्पॉट मार्केट आणि वायदे बाजारात घसरत आहेत.
जागतिक वायदे बाजारात सोन्याचा दर 29 डॉलरने कोसळून 2,557 डॉलर प्रति औंस आणि चांदीचा दर 2.27 टक्क्यांनी कोसळून 29.88 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. याचा अर्थ लघु ते मध्यम पल्ल्यास सोने आणि चांदीचे दर कमी पातळीवर राहण्याची शक्यता असते. दरम्यान अमेरिकेच्या किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर वाढून 3% वर गेला आहे. त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प विविध देशातून होणार्या आयातीवर शुल्क लावणार आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेतील महागाई पुन्हा वाढत जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे फेडरल रिझर्व्हला व्याजदर कपात करता येणार नाही. यामुळे डॉलर बळकट होऊन अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत आहे आणि इतर वित्तीय उत्पादनातील गुंतवणूक अमेरिकेकडे वळत आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रावर याचा परिणाम झाला आहे. समाधानाची बाब म्हणजे भारतात लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे. याच कालावधीत सोने आणि चांदीचे दर बरेच कमी झाले आहेत.