नवी दिल्ली – देशात आणि परदेशात गुंतवणूकदार सोने विकून नफा काढून घेत असल्याचे वातावरण आहे. यामुळे सोने आणि चांदीच्या दरात शुक्रवारी काही प्रमाणात घट झाली. मात्र दीर्घ पल्ल्यात सोने व चांदी आकर्षक गुंतवणूक साधन ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
शुक्रवारी दिल्ली सराफात सोन्याचा दर 170 रुपयांनी कमी होऊन 78,130 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 1,850 रुपयांनी कमी होऊन 88,150 प्रति किलो या पातळीवर गेला होता. जागतिक बाजारात सोन्याचा दर अस्थिर होत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी वायदे बाजारात सोन्याचा दर 13 डॉलरने वाढून 2,621 डॉलर आणि चांदीचा दर 0.141 टक्क्यांनी कमी होऊन 29.19 प्रति औंस या पातळीवर गेला होता.
दरम्यान सध्या जरी सोने आणि चांदीचे दर अस्थिर असले तरी मध्यम ते दीर्घ पल्यात सोने आणि चांदीतील गुंतवणूक आकर्षक ठरण्याची जास्त शक्यता आहे असे विश्लेषकाने बोलून दाखविले. जागतिक पातळीवर सध्या दोन युद्ध चालू आहेत. तसेच अनेक देशांदरम्यान संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशा परिस्थितीत जागतिक चलन बाजारात आणि जागतिक व्यापारात अस्थिरता येण्याची शक्यता आहे. यामुळे काही संस्थागत गुंतवणूकदारांबरोबरच अनेक देशांच्या रिझर्व बँका सोने खरेदी करीत आहेत. अशा परिस्थितीमध्ये सोन्याचा आणि चांदीचा दर काही प्रमाणात वाढत राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.