नवी दिल्ली – गेल्या दोन दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात बरीच वाढ झाली होती. मात्र बुधवारी जागतिक बाजारात सोन्याची विक्री वाढल्याने सोन्याचे दर कमी झाले. रुपयाच्या मूल्यांमध्ये बरीच वाढ झाली. त्यामुळे भारतीय सराफात सोने आणि चांदीचे दर बुधवारी घसरले.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 148 रुपयांनी कमी होऊन 46,307 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 886 रुपयांनी कमी होऊन 68,676 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
या घटनाक्रमाची कारणमीमांसा करताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी झाले. त्याचबरोबर रुपयाचे मूल्य वधारल्यामुळे भारतीय बाजारातही सोन्याचे दर बरेच कमी झाल्याचे दिसून आले. रुपया वधारल्यास सोन्याची आयात महाग होते. भारत आपल्या गरजेचे बहुतांश सोने आयात करतो.
जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,807 डॉलर प्रति औंस तर चांदीचे दर कमी होऊन 27.63 डॉलर प्रति औंस झाला. भारतात काही महिन्यापूर्वी सोन्याचे दर 58 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीपर्यंत गेले होते. नंतर सोन्याच्या दरात घट होत गेली. 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सोन्यावरील आयात शुल्कात पाच टक्क्यांची घट केली. त्यामुळे सोन्याच्या दरात आता विक्रमी पातळीवरुन दहा हजार रुपयापर्यंत घट झाली आहे.
सोन्याचे दर 50 हजार रुपयांच्या खाली असल्यानंतर दीर्घ पल्ल्याचा विचार करून गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खरेदी फायदेशीर होऊ शकते असे विश्लेषक सांगतात. त्यांच्या मते यावर्षी सोन्याचा दर 63 हजार ते 68 हजारापर्यंत वाढू शकतो.