Gold-Silver price today :सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सोन्यासारखा ; दरात मोठी घसरण

वाचा किती रुपयांनी झाले स्वस्त ?;चांदीच्या किंमतीत वाढ

नवी दिल्ली : देशात मागच्या काही दिवसापासुन सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. दरम्यान, बुधवारी सोन्याच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा घसरण झाली आहे.त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा सोन्यासारखा असल्याचे दिसत आहे. बुधवारी सोन्याचे दर १११ रुपयांनी घसरले आहेत. आज दहा ग्राम सोन ४६ हजार ७८८ या दराने विकलं जात आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे.

चांदीची किंमत १३५ रुपयांनी वाढली आहे. आज सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीचा दर ६९ हजार ५०७ रुपये प्रति किलो इतका होता. मागील पाच दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरांमध्ये सतत घसरण होत असून आज मागील आठ महिन्यांमधील निचांक पातळीवर सोन्याचे दर पोहचले आहेत. ऑगस्ट महिन्यामध्ये सोन्याचा दर प्रति तोळा ५६ हजार २०० पर्यंत पोहचला होता. तेव्हापासून आजपर्यंत सोनं प्रति तोळा नऊ हजार ४०० रुपयांनी स्वस्त झाले आहे.

देशामध्ये करोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये लसीकरणाच्या माध्यमातून सकारात्मक बातम्या समोर येत आहेत. याच गोष्टीचा फटका सोन्याच्या किंमतीला बसला असून सोन्याची जोरदार विक्री गुंतवणूकदारांकडून केली जात आहे. करोना लसीकरणामुळे शेअर बाजारामध्ये मोठी उसळी पाहायला मिळत आहे. त्यामुळेच सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांनी आपला मोर्चा आता शेअर बाजाराकडे वळवला आहे.

सोन्याची विक्री करुन तो पैसा स्टॉक मार्केटमध्ये टाकण्याचा कल दिसून येत आहे. शेअर बाजारामध्ये अधिक जलद आणि जास्त रिटर्नस मिळत असल्याने गुंतवणूकदारांनी सोन्याकडे पाठ फिरवल्याचं चित्र दिसत आहे. शेअर बाजारात सध्या तेजी असल्याने अनेकांनी तिकडे गुंतवणूक केल्याचं या क्षेत्रातील जाणकार सांगतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.