नवी दिल्ली – सोमवारी जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी झाले. त्यामुळे भारतीय बाजारातही सोन्याच्या दरात काही प्रमाणात घट नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचे दर 15 रुपयांनी कमी होऊन 44,949 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 216 रुपयांनी कमी होऊन 64,222 रुपये प्रति किलो झाला.
यासंदर्भात बोलताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक बाजारात सध्या संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. करोनाचे रुग्ण काही देशात वाढत आहेत. त्याचा अर्थव्यवस्थेवर नेमका किती परिणाम होत आहे याचा अंदाज गुंतवणूकदारांना येत नाही.
त्यामुळे सोन्याची खरेदी वाढलेली नाही. याचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला. जागतिक बाजारात सध्या सोन्याचे दर 1,727 डॉलर प्रति औंस, तर चांदीचे दर 24.78 डॉलर प्रति औंस या पातळीवर आहेत. सध्या सोन्याचे दर बऱ्याच खालच्या पातळीवर असल्यामुळे काही गुंतवणूकदार निवडक खरेदी करीत आहेत. भारतामध्ये काही महिन्यापूर्वी सोन्याचे दर 58 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीपर्यंत वाढले होते. मात्र त्यामध्ये बरीच घट झाली आहे.