नवी दिल्ली – सोन्याचे दर सध्या बऱ्याच खालच्या पातळीवर आहेत. त्यामुळे काही गुंतवणूकदारांकडून खरेदी होत असल्यामुळे सोमवारी सोन्याच्या दरात थोडी वाढ झाली. मात्र तरीही सोन्याचे दर सध्या 45 हजार रुपयापेक्षा कमी पातळीवर आहेत.
दिल्ली सराफत सोमवारी सोन्याचे दर 61 रुपयांनी वाढून 44,364 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. दिल्ली सराफात चांदीचे दर 162 रुपयांनी वाढून 66,338 रुपये प्रति किलो झाले. एचडीएफसी सिक्युरिटीजच विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, रुपयाच्या मूल्यात वाढ होऊनही सोन्याच्या दरात वाढ नोंदली गेली.
कारण सोन्याचे दर सध्या कमी पातळीवर असल्यामुळे बरेच गुंतवणूकदार खरेदी करीत आहेत. जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी होऊन 1,726 डॉलर प्रती औंस तर चांदीचे दर 25.95 डॉलर प्रति औंस झाले.
जागतिक आर्थिक परिस्थिती सुधारून लागली आहे. त्यामुळे बरीच गुंतवणूक इतर क्षेत्राकडे वळू लागली आहे. त्याचबरोबर डॉलर बळकट होत असल्यामुळे सोन्याचे दर कमी पातळीवर आहेत. आगामी काही काळ तरी सोन्याच्या दरामध्ये फार मोठी वाढ होण्याची शक्यता कमी आहे, असे बऱ्याच विश्लेषकांनी सूचित केले आहे.