नवी दिल्ली – भारतीय सराफात सोने आणि चांदीचे दर कोसळणे चालूच आहे. आता सोन्याचे दर 44 हजारांखाली तर चांदीचे दर 65 हजारांखाली आले आहेत. दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचे दर 522 रुपयांनी कमी होऊन 43,887 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तयार चांदीचा दर दिल्ली सराफात 1,822 रुपयांनी कोसळून 64,805 रुपये प्रत्येक किलो झाला.
याबाबत एचडीएफसी सिक्युरिटीजचे तपन पटेल म्हणाले की, अमेरिकेमध्ये सोन्याचे दर कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम भारतातील सोन्याच्या दरावर झाला आहे. सोन्याची एकतर्फी घसरण होत असल्याबद्धल विश्लेषकांनी सांगितले की, भारत व अमेरिकेसह सरकारी रोख्यावरील परतावा गेल्या आठवड्यात पुन्हा वाढला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आता महागाई गृहीत धरू लागले आहेत. अशा अवस्थेत डॉलर बळकट होऊन सोने कमकुवत होत आहे. याच कारणामुळे जागतिक शेअर बाजार निर्देशांक कमी होऊ लागले आहेत.
भारतात काही महिन्यापूर्वी सोन्याचे दर 58 हजार रुपयांपर्यंत वाढले होते. आता त्यामध्ये बरीच घट झाली आहे. सोन्याचे दर 50 हजार रुपयांच्या खाली असल्यानंतर दीर्घ पल्ल्यातील गुंतवणूकदारांना खरेदी फायदेशीर ठरू शकते असे विश्लेषक सुचवितात. बऱ्याच विश्लेषकांनी या वर्षाच्या अखेरीस सोन्याचे दर 63 ते 68 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केलेला आहे.