नवी दिल्ली – देशांतर्गत आणि जागतिक अर्थव्यवस्था सुधारू लागल्यामुळे सोन्याच्या दरात घसरण चालूच आहे. त्यामुळे काही महिन्यापुर्वी 58 हजारांवर गेलेले सोन्याचे दर आता 45,568 रुपयांवर आले आहे.
शुक्रवारी दिल्ली सराफात सोन्याचे दर 239 रुपयांनी कमी होऊन सोन्याचा दर 45,568 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर चांदीचा दर 723 रुपयांनी कमी होऊन 67,370 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी होऊन 1,774 डॉलर प्रति औंस तर चांदीचा दर 26.94 डॉलर प्रति औंस झाला. भारत सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 1 फेब्रुवारीला कमी केले आहे.
तेव्हापासून सोन्याच्या दरात कमी-अधिक प्रमाणात घट होत आहे. तर जागतिक बाजारात डॉलर बळकट होत असल्यामुळे सोन्याचे दर कमी होत असल्याचे दिसून येते. आता सोने 8 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहे.
मात्र आगामी काळात सोन्याचे दर कमी अधिक प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याचे दर 50 हजार रुपयापेक्षा कमी पातळीवर असल्यानंतर दीर्घ पल्ल्याचा विचार करून खरेदी करणाऱ्यासाठी व्यवहार फायदेशीर राहील, असे बऱ्याच विश्लेषकांना वाटते.
भारतात सोन्याचे दर आता विक्रमी पातळीवरून 10,000 रुपयांनी कमी झाले आहेत. अर्थसंकल्पामध्ये सरकारने सोन्यावरील आयात शुल्क कमी केल्यामुळेही सोन्याच्या दरावर परिणाम झालेला आहे.
त्यामुळे आता सोन्याचे दर जून 2020 च्या पातळीवर आहेत. एक्सचेंज ट्रेडेड फंडातूनही सोन्यातील गुंतवणूक काढून घेतली जात असल्याने दिसून येते. अमेरिकेसह विविध देशांच्या सरकारच्या रोख्यावरील परतावा वाढत असल्यामुळे सोन्याच्या दरावर परिणाम होत आह.