नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याचे आणि चांदीचे दर काही प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे भारतीय सराफात कालपासून सोन्याच्या दरात वाढ होऊ लागली आहे. दिल्ली सराफात सोन्याचे दर 36 रुपयांनी वाढून 47,509 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.
त्याचबरोबर तयार चांदीचा दर दिल्ली सराफात 454 रुपयांनी वाढून 69,030 रुपये प्रति किलो झाले. जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढून 1,844 डॉलर प्रति औंस तर चांदीचे दर वाढून 27.18 डॉलर प्रति औंस झाले.
अर्थसंकल्प जाहीर झाल्यापासून सोन्याचे दर कमी झाले आहेत. भारत सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 2.5 टक्क्यांनी कमी केले आहे. त्यामुळे भारतातील सोन्याची आयात स्वस्त होणार असल्यामुळे गेल्या आठवड्यात सोन्याचे दर कमी झाले होते. मात्र आता जागतिक बाजारात डॉलर कमकुवत होत असल्यामुळे सोन्याचे दर वाढू लागले आहेत.
त्यामुळे भारतातील सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. दरम्यान दिर्घ पल्ल्यात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी सोन्याचे दर 50 हजार रुपयांच्या खाली असल्यानंतर संधी आहे, असे बऱ्याच विश्लेषकांनी सुचविले आहे.
गेल्या वर्षी करोना व्हायरसमुळे शेअर बाजार निर्देशांकाबरोबरच सोन्याचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले होते. मात्र आगामी काळात ही वाढ मर्यादित स्वरूपात राहील असे विश्लेषकांना वाटते.