नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी सोन्यावरील आयात शुल्कात कपात जाहीर केली आहे. त्यामुळे सोन्याचे दर कोसळले. दिल्ली सराफात सोन्याचा दर 1,324 रुपयांनी कमी होऊन 47,520 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मात्र चांदीचे दर 3,461 रुपयांनी वाढून 72,420रुपये प्रति किलो या पातळीवर गेले.
जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढून 1,871 डॉलर प्रती औंस तर चांदीचे दर वाढून 29.88 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेले. मात्र भारतामध्ये आयात शुल्क कमी करण्यात आल्यामुळे या कपातीच्या प्रमाणात या धातूंचे दर कमी होण्याची शक्यता आहे.
सोन्यावरील आयात शुल्क जुलै 2019 मध्ये दहा टक्क्यावरून साडेबारा टक्के करण्यात आले होते. यामुळे इतर प्रश्न निर्माण झाले होते. त्यामुळे या आयात शुल्कात सुसूत्रता आणण्यात येणार असल्याचे सीतारमण यांनी संसदेत सांगितले.
त्यानी सोने आणि चांदीवरील आयात शुल्क साडेसात टक्के केले असल्याची घोषणा केली . या घडामोडीबाबत मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख नवनीत दमानी यांनी सांगितले की सोन्यावरील जास्त आयात शुल्कामुळे इतर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. ते कमी करण्यासाठी आयात शुल्कात कपात करण्यात आली आहे. याचे दागिने उत्पादक स्वागत करण्याची शक्यता आहे.