नवी दिल्ली – अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यानंतर डॉलरच्या किमती वेगाने वाढत आहेत. महत्त्वाच्या सहा चलनाच्या तुलनेत डॉलरचा दर दर्शविणारा डॉलर इंडेक्स सध्या 105.60 या चार महिन्याच्या उच्चांकी पातळीवर गेला आहे. युक्रेन आणि आखातातील पेचप्रसंग संपुष्टात आणण्यास ट्रम्प सर्वात जास्त प्राधान्य देणार आहेत.
त्याचबरोबर ट्रम्प यांच्या धोरणामुळे अमेरिकेतील महागाई वाढून व्याजदर कपात आक्रमकरीत्या होण्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीचे आकर्षण वेगाने कमी होत आहे. त्यामुळे मंगळवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घट नोंदली गेली.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 1,750 रुपयांनी कोसळून 77,800 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 2,700 रुपयांनी कोसळून 91,300 रुपये प्रति किलो झाला. पंधरा दिवसापूर्वी चांदीचा दर एक लाख रुपयापेक्षा जास्त झाला होता. वायदे बाजारात यात दोन धातूचे दर वेगाने कमी होत आहेत. अशीच परिस्थिती कायम राहिली तर नजीकच्या भविष्यात सोन्याचा दर भारतात 72 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीपर्यंत खाली येऊ शकतो असे विश्लेषकांनी नमूद केले.
जागतिक वायदे बाजारात सोन्याचा दर तब्बल 20 डॉलरने कोसळून 2,597 डॉलर आणि चांदीचा दर 0.6 टक्क्यानी कोसळून 30.43 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता. एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक सौमील गांधी यांनी सांगितले की, ट्रम्प यांची अनेक धोरणे उद्योग व्यवसायाला चालना देणारी ठरणार आहे.
त्यामुळे सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीच्या साधनातील रस कमी झाला आहे. मागणी कमी आणि विक्री जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या दरावर परिणाम होत आहे. एकीकडे सोन्याचे दर कमी होत असतानाच बिटकॉइन आणि अमेरिकेच्या शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत आहेत. त्यामुळे गुंतवणूक सोन्याकडून इतर क्षेत्राकडे वळत आहे.