नवी दिल्ली – गेल्या दोन महिन्यांमध्ये सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदी केले जात होते. मात्र आता अचानक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचे आकर्षण कमी झाले आहे. डॉलर आणि संलग्न वित्तीय उत्पादनात गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे डॉलर बळकट होत आहे. अशा परिस्थितीत सोने आणि चांदीच्या दरात घट चालूच आहे.
दिल्ली सराफत सोन्याचा दर 450 रुपयांनी कमी होऊन एकूण 79,550 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तर चांदीचा दर 600 रुपयांनी कमी होऊन 94 हजार रुपये प्रति किलो झाला. गेल्या पंधरवड्यात चांदीचा दर एक लाख रुपयापेक्षा जास्त झाला होता. मात्र चांदीची विक्री वाढत असून चांदीच्या दरावर जास्त दबाव आला आहे.
डॉलर, अमेरिकन कर्जरोखे, बिटकॉइन इत्यादी क्षेत्रात गुंतवणूक वाढत असल्यामुळे सोन्याकडील गुंतवणूक कमी होत आहे. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर पुरेशी मागणी नसल्यामुळे सोन्याचे दर कमी होत असल्याचे अखिल भारतीय सराफा संघटनेने ही आकडेवारी जाहीर करताना सुचित केले.
अमेरिकेच्या अध्यक्षपदावर डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यानंतर सर्वच बाजारपेठावर याचा काही प्रमाणात परिणाम होत आहे. वायदे बाजारात सोन्याचा दर दोन टक्क्यांनी कमी होऊन 2,694 डॉलर आणि चांदीचा दर 0.23 टक्क्यांनी कमी होऊन 31.52 डॉलर पति औंस या पातळीवर गेला होता.
गेल्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत येणार्या निर्यातीवर दहा टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेतील महागाई वाढणार आहे. त्यामुळे फेडरल रिझर्व व्याजदरात कपात करू शकणार नाही. यामुळे अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत आहे. ट्रम्प आगामी काळात कोणते निर्णय सुचित करतात याकडे गुंतवणूकदारांचे जास्त लक्ष आहे.