नवी दिल्ली -देशातील सोने आयात अनेक पटींनी वाढली असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने एप्रिल ते जून या अवधीतील जे आकडे प्रकाशित केले आहेत त्यातून स्पष्ट झाले आहे.
या तीन महिन्यांच्या अवधीत तब्बल 58 हजार 572 कोटी रुपयांचे सोने आयात करण्यात आले आहे. सोन्याच्या मूलभूत भावात जो फरक आहे त्यातून ही आयात वाढली असल्याचे सांगण्यात येते.
गेल्यावर्षी याच अवधीत म्हणजे एप्रिल ते जून 2020 या कालावधीत जेमतेम 5208 कोटी रुपयांचे सोने आयात करण्यात आले होते. या तुलनेत चालू वर्षातील या तिमाहीतील आयात तब्बल दहापट अधिक झाली आहे.
चांदीची आयात मात्र 93.7 टक्क्यांनी कमी झाली आहे. भारत हा जगातला सर्वात मोठा सोने आयात करणारा देश आहे. हे सोने बहुतांशी ज्वेलरी उद्योगासाठी वापरले जाते.
देशात 800 ते 900 टन सोने दरवर्षी आयात केले जाते. सोन्याची आयात वाढल्याने सोन्यात गुंतवणूक वाढल्याचे हे स्पष्ट होते