पुणे-लॉकडाऊन 4.0 बाबत महापालिका प्रशासनाने अखेर आपले आदेश मंगळवारी रात्री उशिरा काढले आहेत. या आदेशात महापालिकेने शहरातील कंटेन्मेंट झोन अर्थात प्रतिबंधित क्षेत्रांची फेररचना केली आहे. तर, या क्षेत्राबाहेर हे नवीन आदेश लागू असतील.
नव्या आदेशानुसार, शहरातील आणखी काही व्यवसायांना परवानगी देण्यात आली असून, त्यात सोन्याची दुकाने तसेच काही प्रमुख रस्ते वगळता शहरातील इतर भागात अधिकृत पथारीधारकांना सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत व्यवसाय करण्यास मुभा देण्यात आली आहे.
कंटेन्मेंट झोनबाहेरील शासकीय कार्यालयात 33 टक्के कर्मचारी उपस्थितीस मान्यता देण्यात आली आहे. तर, सायंकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत संचारबंदी कायम असणार आहे. 65 पेक्षा अधिक वय असलेली व्यक्ती, गर्भवती महिला तसेच 10 वर्षांच्या आतील मुलांना वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. मॉल्स, सलून, स्पा, रिक्षा, कॅब या सेवाही बंदच असतील. पण, एकूण आदेश पाहता शहरातील बराचसा व्यापार बुधवारपासून खुला होणार आहे.