नवी दिल्ली – काल जागतिक बाजारात सोन्याच्या दरात मोठी घट झाल्यानंतर आज भारतीय सराफात सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले. दिल्ली सराफात सोन्याचा दर 810 रुपयांनी कमी होऊन 46,896 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 1,548 रुपयांनी कोसळून 62,720 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
गेल्या काही दिवसांमध्ये सोने आणि चांदीच्या दरामध्ये बरीच वाढ झाली होती. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या काही गुंतवणूकदारांनी नफा काढून घेतल्यामुळे आज सोन्याचे दर कमी झाले असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
मात्र नजीकच्या भविष्यामध्ये महागाई वाढणार असल्यामुळे आणि डॉलर बळकट होणार असल्यामुळे सोन्याचे दर काही प्रमाणात वाढू शकतात असे त्यांना वाटते. एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक संकेतानुसार वायदे बाजारातील दर वाढल्यानंतर स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचे दर वाढले. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,806 डॉलर चांदीचा दर 24.5 डॉलर प्रती औंस या पातळीवर राहिला.