नवी दिल्ली – रशिया- युक्रेन युध्द, रुपयाची घसरण आणि इतर कारणांमुळे भारतासह जागतिक पातळीवर गुंतवणूकदार सोन्याचा आश्रय घेत आहेत. त्यामुळे गेल्या एक महिन्यापासून सोन्याच्या दरात एकतर्फी वाढ होत आहे. अशा परिस्थितीमध्ये सोने विक्रमी पातळीवर जाण्याची लक्षणे दिसून येत आहेत.
सोमवारी जागतिक बाजारात सोन्याचे दर 2 हजार डॉलरपर्यंत वाढल्यानंतर भारतीय सराफात सोन्याचा दर 1,298 रुपयांनी वाढून 53,784 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर गेला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 1,910 रुपयांनी वाढून 70,977 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
सकाळच्या सत्रात रुपयाचा भाव 84 पैशाने कोसळून निचांकी पातळीवर गेला. अशा परिस्थितीमध्ये सोन्याची आयात महाग पडते. जागतिक बाजारात सोन्याचा दर 2,000 डॉलरवर गेल्यानंतर 1,996 डॉलर प्रति औंस या पातळीवर स्थिरावला. चांदीचा दर 25.81 डॉलर प्रति औंस झाला आहे.
जोपर्यंत युद्ध संपत नाही किंवा संपण्याची लक्षणे दिसत नाहीत तोपर्यंत सोन्यामधील गुंतवणूक वाढत जाईल असे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सांगितले. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर भारतामध्ये 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर गेले होते. युद्ध वाढत गेले तर भारतामध्ये सोन्याचे दर या पातळीपर्यंत वाढण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली.
सोन्याबरोबरच पॅलाडीयम या धातूच्या किमती विक्रमी पातळीवर गेल्या आहेत. पॅलाडीयमचा वापर सेमीकंडक्टर आणि वाहन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात केला जातो. सध्या या धातूचे दर 3,169 डॉलर प्रति औंस या पातळीवर आहेत. रशियातून या धातूचा पुरवठा 60 टक्के इतका केला जातो. यामुळे वाहन क्षेत्र आणि सेमीकंडक्टर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे.