नवी दिल्ली – डॉलरचा दर वधारत असल्यामुळे जागतिक पातळीवर सोने आणि चांदीच्या दरात काही प्रमाणात घट नोंदली गेली. त्या प्रमाणात भारतीय बाजारातही सोने आणि चांदीच्या दरात घट झाली असल्याचे दिसून आले.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 169 रुपयांनी कमी होऊन 46,796 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 300 रुपयांनी कमी होऊन 67,611 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,804 डॉलर तर चांदीचा दर 26.01 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. याबाबत एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक शेअर बाजार आणि युरोपीयन शेअर बाजारात अनिश्चित परिस्थिती असल्यामुळे डॉलरचा भाव कमी जास्त होत आहे.
त्या तुलनेत सोन्याच्या दरावर परिणाम होऊ लागला असल्याचे दिसून येते. सध्या तुलनेने सोन्याचे दर कमी असल्यामुळे दीर्घ पल्ल्याचा विचार करून गुंतवणूक करणाऱ्यांकडून सोन्याची खरेदी काही प्रमाणात होत असल्याचे त्यांनी सांगितले.