नवी दिल्ली – जागतिक शेअर बाजारातील गुंतवणूक कमी होत आहे. अशा परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे गुंतवणूकदाराचा कल कायम आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून सोन्याचे दर एकतर्फी वाढत आहेत. सोमवारी सोन्याचा दर 110 रुपयांनी वाढून 80,660 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. गेल्या पाच दिवसांमध्ये सोन्याचा भाव 2.1 टक्क्यांनी म्हणजे 1,660 रुपयांनी वाढला आहे
एलकेपी सिक्युरिटी ज्या संस्थेचे विश्लेषक जतीन त्रिवेदी यांनी सांगितले की, रुपयाचा भाव सोमवारी कोसळला. यामुळे सोन्याची आयात महागात पडणार आहे. त्यामुळेही सोन्याच्या दरात वाढ झाली. अमेरिकेने रशियाच्या खनिज तेलावर निर्बंध घातल्यामुळे आणि जागतिक तणावात वाढ झाल्यामुळे डॉलर बळकट होत आहे. डॉलरकेंद्रित उत्पादनात गुंतवणूक वाढत आहे. चांदीचा दर सोमवारी 93 हजार रुपये प्रत्येक किलो या पातळीवर सलग दुसर्या दिवशी स्थिर राहिला.
जागतिक आणि देशातील वायदे बाजारात सोने आणि चांदीचे दर वाढीव पातळीवर आहेत. जागतिक बाजारात सोन्याचा दर 0.39 टक्क्यांनी वाढून 2,704 आणि चांदीचा दर चांदीचा दर 1.4 टक्क्यांनी वाढून 30.88 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक सौमील गांधी यांनी सांगितले की, अमेरिकेच्या अध्यक्षपदावर डोनाल्ड ट्रम्प विराजमान झाल्यानंतर ते देशात आणि परदेशात महागाई वाढेल अशी धोरणे हाती घेण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत महागाईपासून संरक्षण करण्यासाठी सोन्याची खरेदी वाढली आहे.