Gold rate today : सोने भाव खाण्याची शक्‍यता वाढली…

नवी दिल्ली – जगभरात सुरू करण्यात आलेले लॉक डाऊन, घसरलेले औद्योगिक उत्पादन, थंडावलेला जागतिक व्यापार या कारणामुळे गेल्या नऊ महिन्यात सोन्याच्या भावात बरेच चढ-उतार झाले आहेत. नऊ महिन्यांपूर्वी भारतामध्ये सोन्याचा दर 58 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर गेला होता.

लॉकडाऊन उठविल्यानंतर इतर क्षेत्रातील उत्पादकता वाढू लागल्यामुळे नंतर सोन्याच्या दरात घसरण होत गेली. 15 दिवसांपूर्वी सोन्याचा दर 44 हजार रुपयांवर गेला होता. मात्र आता सोन्याच्या दरात काही प्रमाणात वाढ होत असून सध्या सोन्याचा दर 46 हजार रुपयांवर आला आहे.

त्यामुळे आगामी काळात सोन्याची वाटचाल कशी राहील याबाबत गुंतवणूकदारांच्या मनात उत्सुकता आहे. जागतिक पातळीवर वाढत असलेले करोना रुग्ण आणि लॉकडाऊन या कारणामुळे अल्प ते मध्यम पल्ल्यात सोन्याचे दर वाढण्याची शक्‍यता बऱ्याच विश्‍लेषकांना वाटते. सरलेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात बरीच वाढ झाली आहे. वायदे बाजारातील सोन्याच्या दरावरून स्पॉट मार्केटमधील सोन्याच्या दराचा अंदाज मिळतो.

गेल्या आठवड्यात जागतिक वायदे बाजारात सोन्याचा दर 1,754 प्रति औंस झाला. तांत्रिक विश्‍लेषकांच्या मते सोन्याचा दर जर 1,750 डॉलरच्या वर टिकला, तर सोन्याचा दर आगामी काळात वाढत जाण्याची शक्‍यता आहे. अशा अवस्थेत सोन्याचा दर पुढील दोन महिन्यात 1,800 डॉलर पर्यंत वाढवू शकतो. तर दिवाळीपर्यंत जागतिक वायदे बाजारात सोन्याचा दर 1,900 डॉलरपर्यंत जाऊ शकतो. अशा अवस्थेत दिवाळीपर्यंत भारतीय वायदे बाजारात सोन्याचा दर 52 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीपर्यंत जाऊ शकतो.

भारतात या आठवड्यात सोन्याचे दर का वाढले आहेत, त्याबाबत आयआयएफएल ब्रोकरेज या संस्थेचे वस्तू आणि चलन विभागाचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी सांगितले की, जागतिक आर्थिक परिस्थिती खालावत असल्यामुळे डॉलर वधारत आहे आणि रुपया घसरला आहे. त्याचबरोबर भारतीय बाजारात लग्नासाठी सोन्याची खरेदी वाढली आहे. परिणामी सोन्याचे दर वाढत आहेत.

सोन्याचे दर जागतिक बाजारात 1,750 डॉलरच्या पुढे गेल्यानंतर ते दोन महिन्यात 1,800 डॉलर आणि दिवाळीपर्यंत 1,900 डॉलर या पातळीवर जातील या मताला त्यांनी दुजोरा दिला. अशा अवस्थेत दोन महिन्यात भारतातील सोन्याचे दर 48 हजार रुपये पर्यंत जाऊ शकतात असे त्यांना वाटते.

मोतीलाल ओसवाल या ब्रोकरेजचे उपाध्यक्ष अमित सजेजा यांनी सांगितले की, भारतात सोन्याचा दर 45,600 रुपयांच्या वर असेल तर आगामी काळात सोन्याच्या दरात वाढ होऊन ही पातळी 48 हजार रुपयापर्यंत नजीकच्या भविष्यात जाऊ शकते. त्यामुळे या पातळीच्या जवळपास सोने खरेदी करणाऱ्यांना पुढील दोन महिन्यात फायदा होऊ शकतो. दिवाळीपर्यंत सोने 52 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकेल असे बऱ्याच जणांना वाटते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.