नवी दिल्ली – करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जगातील विविध बाजारात खरेदी-विक्रीच्या लाटा येत आहेत. त्यामुळे आज सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली. दिल्ली सराफ सोन्याचा दर केवळ 9 रुपयांनी वाढून 46,431 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर केवळ 53 रुपयांनी वाढून 67,460 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढून 1,764 डॉलर तर चांदीचे दर 25.87 डॉलर प्रति औंस झाले. जागतिक बाजारात डॉलर थोडा कमकुवत झाला आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या कर्जराख्यावरील परतावा कमी झाल्यामुळे सोन्याचे दर वाढले असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानी म्हणाले की, महागाई वाढण्याची शक्यता असल्यामुळे अमेरिकेतील कर्जराख्यावरील परतावा कमी झाला आहे. त्यामुळे महागाई पासून बचाव करण्यासाठी काही गुंतवणूकदार सोने खरेदी करीत आहेत.
सध्या भारतात सोन्याचे दर 46,000 रुपये या पातळीवर आहेत. काही महिन्यापूर्वी सोन्याचे दर 58 हजार रुपयांपर्यंत गेले होते. दीर्घ पल्ल्याचा विचार करून गुंतवणूक करणारे बरेच लोक सोने खरेदी करीत आहेत. त्याचबरोबर ज्यांचे लग्न होणार आहे असे लोकही सोन्याची खरेदी सध्याच्या भावावर करीत असल्याचे वातावरण आहे.