कोल्हापूर – फळांचा राजा अशी ओळख असणाऱ्या हापूस आंब्याला कोल्हापूरच्या मार्केट यार्डात सोन्याचा दर आला. खासदार धनंजय महाडिक यांनी पाच डझनच्या हापूस आंब्याच्या पेटीसाठी तब्बल 51 हजार रुपयांची बोली लावली. खासदार महाडिक यांच्यामुळे हापूस आंब्याला उच्चांकी दर मिळाला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यातील बाजारपेठेंच्या तुलनेत हा दर सर्वाधिक आहे.
फळांचा राजा अशी ओळख असणाऱ्या कोकणच्या हापूस आंब्याचे कोल्हापूरच्या मार्केट यार्डात आगमन झाले आहे. देवगड तालुक्यातील कुंभार मठ येथील सुहास दिनकर गोवेकर यांच्या बागेतील हापूस आंबे यासिन बालमभाई बागवान यांच्या पेढीवर आले आहेत. कोल्हापुरच्या बाजारपेठेत आगमन झालेल्या कोकणच्या हापूस आंब्याच्या पाच डझनच्या पहिल्या पेटीचा सौदा खासदार धंनजय महाडिक यांच्या हस्ते काढण्यात आला.
यावेळी पाच हजार रूपयांपासून बोलीची सुरूवात झाली. बघता बघता आंब्याचा दर सुसाट वाढत गेला. अखेर खासदार धनंजय महाडिक यांनीच पाच डझनच्या आंब्याच्या पेटीसाठी 51 हजार रुपयांची बोली लावली. उच्चांकी बोली लावत त्यांनी सौद्यातील पाच डझनची पहिली पेटी खरेदी केली. आंबा लिलावाच्या आजवरच्या इतिहासात कोल्हापूर मार्केटमध्ये लागलेली ही सर्वाधिक रकमेची बोली आहे. उच्चांकी दर मिळाल्याने आंबा बागायतदार गोवेकर यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.