नवी दिल्ली – आयात होणाऱ्या सोन्यावर साडेबारा टक्के आयातशुल्क असल्यामुळे स्मगलिंग आणि इतर गैरप्रकार वाढत होते. त्याच बरोबर सोन्याच्या दागिण्याची निर्यात महागात पडत होती. या कारणामुळे अर्थ मंत्रालयाने सोन्यावरील सीमाशुल्क कमी करून ते आता 7.5 टक्के आहे.
त्याचबरोबर चांदीवरील आयात शुल्के कमी करून साडेसात टक्के करण्यात आले आहे. मात्र एकीकडे सीमा शुल्कामध्ये पाच टक्के कपात केली असताना सोने आणि चांदीवर अडीच टक्के इतका कृषी पायाभूत विकास अधिभार लावण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात कर कपात केवळ अडीच टक्के होऊन ते दहा टक्के इतकीे झाली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या या घोषणेचे दागिने उत्पादकांनी स्वागत केले आहे. आम्ही गेल्या अनेक महिन्यापासून आयात शुल्क म्हणजेच सीमा शुल्क कमी करण्याची मागणी करीत होतो. त्यामुळे देशांतर्गत दागिने बाजाराला चालना मिळणार आहे.
गेल्या अनेक महिन्यापासून कोरोनाव्हायरस आणि महाग सोन्यामुळे दागिने क्षेत्रावर परिणाम झाला होता. त्याचबरोबर स्वस्त सोने उपलब्ध होणार असल्यामुळे दागिन्यांची निर्यातही होऊ शकेल असे दागिने उत्पादक परिषदेचे अध्यक्ष कॉलीन शाह यांनी म्हटले आहे.
ग्राहकांची क्रयशक्ती कमी झाल्यामुळे आणि सोने आणि चांदी महाग होत असल्यामुळे या दोन धातूंची आयात गेल्यावर्षी कमी झाली आहे. त्याचबरोबर निर्यातही कमी झाली असल्याचे त्यांनी सांगितले.