मंदी, व्यापार युद्ध, ब्रेक्झिट इत्यादींचा परिणाम
पुणे – डिसेंबर महिन्यापासून देशात सोन्याच्या दरात तब्बल 25 टक्के वाढ झालेली आहे. हीच परिस्थिती आंतरराष्ट्रीय बाजारातही आहे. नजीकच्या काळातही सोन्याचे दर अस्थिर राहण्याची शक्यता आहे.
मध्यंतरी सोन्याचे दर बरेच वाढले होते. नंतर उच्च पातळीवर ग्राहकांनी नफा काढून घेतला. मात्र, तरीही सध्या सोन्याचे दर डिसेंबरच्या तुलनेत 25 टक्क्यांनी जास्त आहे. जागतिक बाजारात सोन्याचे दर या आठवड्यात 1500 डॉलर प्रति औंस या पातळीवर स्थिरावले आहेत. तर भारतातील सोन्याचे दर 39 हजार 600 रुपयांच्यादरम्यान आहेत. या दरवाढीची मिमांसा करताना विश्लेषकांनी सांगितले की, जागतिक पातळीवरील अनेक कारणांमुळे गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी सोन्याचा आश्रय घेत असल्यामुळे सोन्याचे दर वाढले आहेत.
अमेरिकेने अनेक देशांबरोबर व्यापारी युद्ध सुरू केले आहे. युरोपियन समुदायातून ब्रिटनबाहेर पडणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणे निधीने चालू आर्थिक वर्षाचा जागतीक विकास दर केवळ 3.2 टक्के इतका राहणार असल्याचे सांगितले आहे. 2008 नंतर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने यावर्षी 2 वेळा व्याजदरात कपात केली आहे. भारत, न्यूझीलंड आणि थायलंडमध्ये या वर्षात अनेकवेळा व्याजदर कपात करण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणूक सोन्याकडे वळत आहे. याबरोबरच अमेरिका -इराण, तुर्कस्थान-सिरिया, इराण-सौदी अरेबियाया देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
त्यामुळे आगामी काळात सोन्याचे दर एक तर सध्याच्या पातळीवर स्थिर राहतील किंवा ते काही प्रमाणात वाढू शकतील, असे विश्लेषकांना वाटते. मात्र आगामी काळातील निवडणुका लक्षात घेऊन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जर, नमते घेऊन चीनबरोबर व्यापारी करार केला तर परिस्थिती काही प्रमाणात सावरू शकते, असे बोलले जात आहे. आगामी काळात भारतामध्ये लग्नसराई आणि काही सण येणार आहेत. मात्र, भारतात मंदी अधिक गडद झाली आणि परकीय व्यापारात तूट निर्माण झाली तर, रुपयाचे मूल्य कमी होऊन सोन्याचे दर काही प्रमाणात वाढू शकतात.