नवी दिल्ली – करोना व्हायरसची लस दृष्टिपथात असल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी झाले. त्या प्रमाणात भारतीय सराफातही सोन्याचे दर कमी झाले आहेत.
बुधवारी दिल्ली सराफात सोन्याचे दर 1,230 रुपयांनी कमी होऊन 52,950 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. त्याचबरोबर तयार चांदीचे दर 5,175 रुपयांनी कमी होऊन 67, 585 रुपये प्रति किलो झाले. भारतातील सोने आणि चांदीच्या फ्युचर मार्केटमध्येही सोने आणि चांदीचे दर कमी झाले आहेत.
अमेरिकेमध्ये सोन्याचे 1,930 डॉलर प्रति औंस तर चांदीचे दर 25.70 डॉलर प्रति औंस झाले. करोना व्हायरसमुळे औद्योगिक उत्पादन कमी होणार असल्यामुळे जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदी खरेदी केल्यामुळे सोन्याचे दर वाढले होते. मात्र, आता लवकरच लस येणार असल्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील परिस्थिती पूर्ववत होईल, म्हणून सोने आणि चांदी बाळगणारे विक्री करून नफा काढून घेत असल्यामुळे सोन्याचे दर कमी झाले असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.