नवी दिल्ली: चीनमधील “करोना’चे पडसाद जागतिक कमॉडिटी बाजारावर उमटत आहेत. शुक्रवारी कमॉडिटी बाजारात सोन्याच्या दरात 1.03 टक्क्यांनी वाढ झाली. या दरवाढीने सोने प्रति औंस 1638.10 डॉलरपर्यंत वाढले आहे. मागील सात वर्षांतील सोन्याचा जागतिक बाजारातील सर्वोच्च दर आहे. देशातील सराफा बाजारात सोने झळाळून उठले आहे. आज दिल्लीत सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमला 433 रुपयांनी वधारून 42,472 रुपयांवर गेला.
मागील काही सत्रात सोन्यात तेजी दिसून आली आहे. “करोना’मुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर कमी होईल, असे अंदाज विविध संस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोने गुंतवणुकीला पसंती दिली आहे. यामुळे सोन्याच्या भावात आज मोठी उसळी दिसून आली आहे. यापूर्वी 14 फेब्रुवारी 2013 मध्ये जागतिक बाजारात सोन्याचा भाव 1635.98 डॉलर प्रति औसपर्यंत वाढला होता. आज चांदीच्या दरात 0.9 टक्के वाढ झाली असून चांदीचा भाव प्रति औंस 18.52 डॉलरवर गेला.
दरम्यान, लग्नसराई असल्याने देशात सोने मागणी वाढली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात तेजी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात मोठी उसळी दिसून येत आहे.