नवी दिल्ली – जागतीक बाजारात सोन्याचे दर ( gold price today ) कमी झाल्यामुळे बुधवारी भारतीय बाजारातही सोन्याचे दर 118 रुपयांनी कमी होऊन 49,221 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तयार चांदीच्या दरातही दिल्ली सराफात 875 रुपयांची घट होऊन तयार चांदीचा दर 63,410 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
सोन्याचे दर घसरण्याची कारणमीमांसा करताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी झाल्यामुळे आणि रुपया स्थिर असल्यामुळे सोन्याच्या आणि चांदीच्या दरात ( Silver price today ) किंचित घसरण झाली आहे. जागतीक बाजारात सोन्याचे दर 1,868 डॉलर प्रति औंस तर चांदीचे दर 24.22 डॉलर प्रति औंस आहेत.
पटेल म्हणाले की, करोनाव्हायरसची लस उपलब्ध होणे आता स्पष्ट झाले आहे. विविध देश लसीकरणाचा कार्यक्रम तयार करीत आहेत. यामुळे आर्थिक व्यवहार वाढतील. परिणामी भांडवल शेअर बाजाराकडे वळत असल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत आहेत आणि सोन्याला मागणी कमी झाल्यामुळे सोन्याचे दर कमी होत आहेत.
मात्र अमेरिकेकडून आणखीही पॅकेज जाहीर होण्याचे धोरण दृष्टिपथात नाही. त्याचबरोबर डॉलर कमकुवत असल्यामुळे सोन्याचे दर जास्त प्रमाणात घसरणार नाहीत, असे पटेल यांनी सांगितले. आज रुपयाचा दर डॉलरच्या तुलनेत केवळ तीन पैशांनी वाढून रुपयाचा भाव 73 रुपये 57 पैसे प्रति डॉलर या पातळीवर राहिला.