नवी दिल्ली – ब्रिटनमधील नव्या करोनाचा जगातील विविध बाजारावर परिणाम झाला आहे. त्यामुळे सेफ हेवन समजल्या जाणाऱ्या सोन्याच्या खरेदीत वाढ होऊन सोन्याचे दर वाढले. शेअर बाजाराचा निर्देशांक कोसळून रुपया घसरल्यामुळेही सोन्याच्या दरात ( Gold Price Today ) वाढ झाली. रुपया कममुवत झाल्यास सोन्याची आयात महागात पडत असते. लघु पल्ल्यात तरी सोन्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली असल्याचे वातावरण आहे.
भारतात सोमवारी सोन्याचे दर 496 रुपयांनी वाढून 50,297 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. त्याचबरोबर चांदीचा भाव ( silver price today ) दिल्ली सराफात 2,249 रुपयांनी वाढून 69,477 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
या घटनाक्रमाबद्दल एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक पातळीवर करानाचे रुग्ण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती खराब होण्याची शक्यता असल्यामुळे लोक सेफ हेवन समजल्या जाणाऱ्या सोन्याकडे अल्प मुदतीत तरी वळले आहेत.
जागतिक बाजारात सोन्याचे दर 1,898 डॉलर प्रति औंस तर चांदीचे दर 26.63 प्रती औंस या पातळीवर गेले आहेत. ब्रिटनमध्ये बदललेला करोना पसरत असल्यामुळे जागतिक वाहतुकीवर परिणाम झाला आहे.