Gold Price Today: सोन्याचा भाव एका दिवसात 5080 रुपयांनी वाढला, भाववाढीची कारणं जाणून घ्या…

Gold Price Today: दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या किमतीने नवा उच्चांक गाठला. आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक संकेतांच्या जोरावर सोन्याचा भाव एका दिवसात तब्बल ५,०८० रुपयांनी उसळून १,१२,७५० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. सोमवारी हा भाव १,०७,६७० रुपये प्रति १० ग्रॅम होता. सोन्यासोबतच चांदीनेही मोठी झेप घेतली. चांदीचा भाव २,८०० रुपयांनी वाढून १,२८,८०० रुपये प्रति किलोग्रॅम झाला, तर मागील सत्रात तो १,२६,००० रुपये प्रति किलोग्रॅम होता.
आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा परिणाम
जागतिक बाजारातही सोन्याने नवा विक्रम नोंदवला. मंगळवारी सोन्याचा भाव ३,६५९.२७ डॉलर प्रति औंसवर पोहोचला, जो आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर आहे. नंतर तो ३,६५२.७२ डॉलर प्रति औंसवर स्थिरावला, म्हणजेच त्यात ०.४६% वाढ नोंदवली गेली.
किमती वाढण्यामागील कारणे
सराफा व्यापाऱ्यांच्या मते, अमेरिकेतील अलीकडील कमकुवत रोजगार डेटामुळे फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करेल, अशी शक्यता वाढली आहे. व्याजदरात कपात झाल्यास सोन्याची मागणी वाढते, कारण गुंतवणूकदार सोन्याला सुरक्षित पर्याय मानतात. याशिवाय, डॉलरच्या मूल्यातील घसरणीनेही सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंना आधार मिळाला. मंगळवारी डॉलर इंडेक्स, जो सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद दर्शवतो, ०.१७% घसरून ९७.२९ वर आला.
बाजारातील तज्ज्ञांचे मत
आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता आणि आर्थिक घडामोडींमुळे सोने आणि चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. गुंतवणूकदारांचा कल सुरक्षित मालमत्तांकडे वाढल्याने येत्या काळातही सोन्याच्या किमतीत तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.





