नवी दिल्ली – जागतिक पातळीवर शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत आहेत. त्याचबरोबर डॉलर वधारत असल्यामुळे सोन्याचा दर कमी होत आहे. त्यामुळे भारतीय सराफातही सोन्याच्या दराची घसरण चालूच आहे.
गेल्या तीन दिवसापासून भारतीय बाजारात सोन्याचे दर कमी होत आहेत. दिल्ली सराफात बुधवारी सोन्याचा दर सहा रुपयांनी कमी होऊन 46,123 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीच्या दरात मात्र 515 रुपयांची घट होऊन चांदीचा दर 61,821 रुपये प्रति किलो झाला.
याबाबत माहिती देताना एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे वरिष्ठ विश्लेषक तपण पटेल यांनी सांगितले की, जागतिक आर्थिक व्यवस्था सुधारण्याची लक्षणे दिसत असल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत आहेत. भांडवल शेअर बाजारातकडे जात आहे.
त्याचबरोबर डॉलरचा भाव वधारत असल्यामुळे वायदे बाजारात सोन्याचे दर कमी होत आहेत. त्याचा परिणाम स्पॉट मार्केटवर होत आहे. सध्या भारतीय बाजारात सोन्याचे दर कमी असल्यामुळे लग्नासाठी आणि सणासाठी सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.