नवी दिल्ली – शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत आहेत. त्याचबरोबर परकीय गुंतवणूक परत येत आहे. या कारणामुळे सोन्याचा दर आणखी वाढणार नाही असे समजणार्या ग्राहकांनी बरीच नफेखोरी केल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून विक्री केल्यामुळे सोन्याचे दर कमी होत आहेत.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 400 रुपयांनी कमी होऊन 91,250 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तर तयार चांदीचा दरही सलग दुसर्या दिवशी 1,700 रुपयांनी कमी होऊन 1 लाख 200 रुपयावर आला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले, की बर्याच गुंतवणूकदारांनी नफेखोरी केल्यामुळे आणि डॉलर इंडेक्स काही प्रमाणात बळकट झाल्यामुळे सोन्याचा दर कमी झाला.
देशातील आणि जागतिक वायदे बाजारातही सोने आणि चांदीचे दर कमी होत आहेत. असे असले तरी अमेरीकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेले व्यापार युद्ध अजून संपलेले नाही. दोन एप्रिलला ते जशास तसे आयात शुल्क लावण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. अशा परिस्थितीत सोने आणि चांदीचे दर उच्च पातळीवर काही काळ कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.