नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी झाले. त्याचबरोबर रुपयाचे मुल्य गेल्या तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घट चालू आहे.
मंगळवारी दिल्ली सराफात सोन्याचा दर 100 रुपयांनी कमी होऊन 46,272 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 134 रुपयांनी कमी होऊन 62,639 रुपये प्रति किलो झाला.
गेल्या दोन दिवसापासून रुपयाच्या मूल्यामध्ये वाढ होत आहे. आजही रुपयाचा दर 29 पैशांनी वाढून 73 रुपये प्रति डॉलर झाला. यामुळे आयात स्वस्त होते. परिणामी सोन्याच्या दरात घसरण होत आहे असे विश्लेषकांनी सांगितले.
जागतिक बाजारातील मिळालेल्या माहिती नुसार जागतिक बाजारात सोन्याचा दर 1815 डॉलर व चांदीचा दर 24.16 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. सध्या सोने आणि चांदीचे दर बरेच कमी आहेत. त्याचबरोबर आगामी काळामध्ये भारतामध्ये दिवाळी-दसरा हे सण येणार आहेत. या काळात भारतात सोन्याची खरेदी केली जाते.
सोन्याचे दर कमी असल्यामुळे आगामी काळामध्ये भारतामध्ये सोन्याची खरेदी वाढण्याची शक्यता असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.