-विधिषा देशपांडे
धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन किंवा पाडव्याचा मुहूर्त साधून सोनेखरेदी किंवा दागिन्यांची खरेदी हमखास केली जाते. याचे कारण म्हणजे सोन्याला किंवा किमती दागिन्यांना भारतीय संस्कृतीमध्ये खूप मोलाचे स्थान आहे. ते समृद्धीचे प्रतीक मानले जातात. म्हणूनच दिवाळीतील पाडव्याच्या शुभमुहुर्तावर सराफी पेढ्या ग्राहकांच्या गर्दीने फुललेल्या असतात. अलीकडच्या काळात पारंपरिक दागिन्यांसोबतच लाइटवेट दागिने, हिऱ्यांचे आकर्षक दागिने आणि मोत्यांचे पारंपरिक व पाश्चात्य पेहरावावर चालतील असे दागिने अशा वेगवेगळ्या दागिन्यांचा ट्रेंड महिलावर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे आणि त्यादृष्टीने आपल्या बजेटनुसार असंख्य प्रकारची व्हरायटीही बाजारपेठेत दिसत आहे.
दिवाळी हा आनंदाचा, प्रेमाचा आणि त्याचप्रमाणे समृद्धीचा सण असतो. दीपावली पाडवा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक असल्याने या दिवशी मोठी खरेदी हमखास केली जाते. त्यामध्ये अर्थातच सोन्याच्या अथवा दागिन्यांच्या खरेदीला प्राधान्य दिले जाते. ही खरेदी करताना तिहेरी फायदे बघितले जातात. एक तर समस्त महिलावर्गाची दागिन्यांची हौस ही अगदी अनादीकालापासूनची आहे. कुठल्याही महिलेला दागिने घालणे हे आवडत असते. त्यामुळे दागिन्यांची खरेदी ही नेहमीच समस्त महिलावर्गासाठी आनंदाची गोष्ट असते. याचा दुसरा फायदा म्हणजे सोन्यातील गुंतवणूक हीदेखील अलीकडच्या काळात चांगली गुंतवणूक मानली जाऊ लागली आहे.
पूर्वीच्या काळीसुद्धा शेतातील पीक आल्यानंतर सोने घेऊन ठेवले जात असे. ते अडीअडचणीला उपयोगात येईल, असा एक विचार त्यामागे असायचा. गेल्या काही वर्षांतील सोन्याच्या वाढत्या किमती पाहता बरेच जण सोनेखरेदी हा पर्याय गुंतवणुकीसाठी चांगला मानू लागले आहेत. दिवाळीच्या मुहुर्तावर सोने अथवा सोन्याची वस्तू किंवा कुठलाही दागिना घरात आणणे म्हणजे त्या रूपाने आपल्या घरात लक्ष्मी आली, अशी श्रद्धा भारतीय लोकांच्या मनात असल्यामुळे या दिवसांमध्ये बरेच जण सोने अथवा दागिन्यांची खरेदी करतात. दागदागिने आणि सोने घरात असणे म्हणजे समृद्धी घरात आहे, असे मानले जाते. म्हणूनच या दिवसांत भारतीय लोक सोने खरेदी करतात.
बदलत्या काळानुसार स्त्रियांच्या राहणीमानात बदल पडू लागला आहे. तसा तिच्या वस्रप्रावरणात अथवा दागदागिन्यांमध्येसुद्धा मोठा बदल दिसू लागला आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे ठराविक ठसठशीत दागिनेच अलीकडच्या स्त्रिया घालताना दिसत नाहीत; तर या दागिन्यांबरोबरच लग्नसमारंभ, सणासुदीला घालण्याचे दागिने, पार्टीला जाण्यासाठी लागणारे दागिने तसेच नोकरीच्या ठिकाणी सहजतेने वावरता येऊ शकतील असे दागिने, असे वेगवेगळे दागिने आपल्याजवळ बाळगताना दिसतात. बाजारपेठेत अशा सर्व प्रकारच्या दागिन्यांची विविधता आपल्याला पाहायला मिळते.
असे असले तरीही पारंपरिक दागिन्यांची क्रेझ मात्र बदलत्या काळातही टिकून आहे. त्यामध्ये थोडेसे आधुनिक बदल नक्कीच झालेले आहेत; परंतु प्रत्येक कुटुंबातील महिला ठसठशीत दिसणारा एखादा दागिना अथवा सेट अवश्य खरेदी करते. म्हणूनच अशा दागिन्यांची मालिकाच दिवाळीच्या दरम्यान सराफी पेढ्यांमधून सादर केली जाते. यामध्ये चपलाहार, मोहनमाळ, नेकलेस, त्यात जडाव काम केलेले प्रकार तसेच कुंदन ज्वेलरी, पोल्की स्टाइल राजस्थानी थेवा ज्वेलरी असे विविध प्रकार सध्या बाजारात दिसत आहेत.
तरुणींबरोबरच नोकरदार-विवाहित महिलांना आवडणारा सध्याचा दागिन्यांचा प्रकार म्हणजे हिऱ्यांचे दागिने होय. अलीकडे सोन्यापेक्षाही जास्त हिऱ्यांचे दागिने दैनंदिन स्वरूपाच्या समारंभांना घातले जातात. काही वर्षांपूर्वी हिरा हा फक्त श्रीमंतांचीच मक्तेदारी मानला जात होता; परंतु आता वेगवेगळ्या ब्रॅंडस्चे हिऱ्यांचे दागिने बाजारात आल्यामुळे स्पर्धाही वाढली आहे आणि यामध्ये भरपूर व्हरायटीही पाहायला मिळू लागली आहे. शिवाय, उच्च मध्यमवर्गीय लोकांच्या हातात या दिवसांत बोनसचा पैसा आल्यामुळे बरेच जण हिऱ्यांचे दागिने खरेदी करताना दिसतात. यामध्ये सोन्याच्या कोंदणात हिरा, पाचू आणि माणिक अशा तिहेरी मिश्रणातून सुरेख दागिने तयार केलेले दिसतात. हिऱ्यांमध्ये नेकलेस, अंगठी, कानातले यांबरोबरच बांगड्या, वाकी, ब्रेसलेट, हातातील कडे असे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. दिवाळीनंतर लगेचच लग्नाचा सिझन असल्यामुळे बरेच जण या शुभमुहुर्तावर साखरपुड्याच्या रिंग्जची खरेदीही करताना दिसतात. अलीकडे हिऱ्याचीच रिंग घालण्याची पद्धत बऱ्यापैकी रुजलेली दिसते.
हिरे आणि सोन्याच्या दागिन्यांबरोबरच अलीकडे मोत्याच्या दागिन्यांचेही आकर्षण बऱ्यापैकी वाढलेले दिसते. कारण हे दागिने पाश्चिमात्य किंवा पारंपरिक कुठल्याही प्रकारच्या पेहरावावर आकर्षक दिसतात. सगळ्यांनाच सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने घेणे परवडत नाही. तेव्हा मोत्याचे दागिने ऑल टाइम फेव्हरिट ठरतात. शिवाय, या दागिन्यांमध्ये इतकी विविधता असते की घेणाऱ्याला कोणता प्रकार घ्यावा, असा प्रश्न पडतो. मोती पोवळे, मोती पाचू असे सुंदर कॉम्बिनेशन करून वेगवेगळ्या प्रकारचे दागिने सजवले जातात. यामध्ये गळ्यातले, कानातले आणि बांगड्या असा सेटही उपलब्ध असतो. शिवाय यापैकी कुठलीही एक गोष्ट आपल्याला घ्यायची असेल तर त्याचाही पर्याय उपलब्ध असतो. खऱ्या मोत्यांबरोबरच चायनिज, जापनीज आणि कल्चर्ड मोतींचे दागिनेसुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. त्यांची किंमत वाजवी असतेच; परंतु त्याचबरोबर ते दिसायलाही खूप आकर्षक असतात. शिवाय हे दागिने सोन्यातच जडवलेले असतात असे नाही. चांदीवर जडावकाम करून त्याला सोन्याचे पॉलिश दिलेले दागिने रिझनेबल भावात मिळतात. त्यामुळे ते सगळ्यांना परवडतातही. शिवाय, काही वर्षांनी पॉलिश गेल्यास ती पुन्हा करूनही मिळते.
सोन्या-चांदीच्या ठसठशीत दागिन्यांबरोबरच कमी वजनाचे लाइटवेट दागिने आणि टेम्पल ज्वेलरीचा ट्रेंडही अलीकडे जोरदार असल्याचे दिसते. टेम्पल ज्वेलरी ही अधिक वजनाची असते; पण त्यावर कोरीव काम केलेली कृष्ण, लक्ष्मी, गणपती अशी देवतांची प्रतिमा फारच आकर्षक रूपात सजवलेली असते. शिवाय आजूबाजूला माणिक आणि पाचूंचे जडावकाम करून ही ज्वेलरी अधिक सजवली जाते. ऑफिसवेअरसाठी किंवा छोट्या-मोठ्या समारंभांसाठी सहज घालता येतील म्हणून लाइटवेट ज्वेलरीचा वापर केला जातो. लाइटवेटमध्ये खड्यांचा वापर करून तयार केलेला दागिना अधिक प्रमाणात घातला जातो. शिवाय, बजेटचे गणितही यामुळे सोपे होते.
याबरोबरच अलीकडे समस्त महिलावर्गात मालिकांमधील नायिकांनी घातलेल्या दागिन्यांचीही क्रेझ बऱ्याच प्रमाणात दिसून येते. यामध्ये ऐतिहासिक मालिकांमधील विशिष्ट प्रकारचे दागिने किंवा पारंपरिक सासू-सुनेच्या मालिकांमधील वेगवेगळे फॅन्सी दागिने त्यांचाही ट्रेंड त्या-त्या मालिकांनुसार दरवर्षी येतच असतो. यामध्ये नवरत्न सोन्याच्या नेकलेसपासून हेवी वेटेड दागिन्यांपर्यंत बरेच प्रकार पाहायला मिळतात. शिवाय, सध्या जान्हवी मंगळसूत्र किंवा तत्सम लांब मंगळसूत्रांची फॅशनही जोरदार असल्यामुळे अशीही खरेदी या दिवसांत होत असते.