पुणे – महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि पुण्यातील अमनोरा टाऊनशीपचे विकसक असलेल्या सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे आयोजित 63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माती विभागात सोलापूरचा प्रशांत जगपात (86 किलो) व कोल्हापूर शहराचा नितीन पवार (70 किलो) यांनी सुवर्णपदके पटकावले.
म्हाळुंगे- बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकूल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत हे अतीतटीचे सामने रंगले होते. यात सोलापूरचा प्रशांत जगपात (86 किलो) व कोल्हापूर शहराचा नितीन पवार (70 किलो) यांनी सुवर्णपदक पटकावले. आज 70 व 86 किलो वजनी गटातील माती विभागातील अंतिम फेरीचे सामने पार पडले. यात 86 किलो वजनी गटात माती विभागात सोलापूरच्या प्रशांत जगताप याने अहमदनगरच्या आकाश भिंगारेला 8-2 गुणांनी पराभूत करत सुवर्णपदक पटकावले. प्रशांत हा वयाच्या 22 व्या वर्षी प्रथमच महाराष्ट्र केसरी वजनी गट स्पर्धेतीत सहभागी झाला आणि पहिल्याच वर्षी सुवर्णपदकावर त्याने आपली मोहर उमटविली. सोलापूर जिल्ह्यातील कुंभारगाव येथील हा पहिलवान वस्ताद अमृत मामा भोसले यांच्या तालमीत तयार झाला आहे. तसेच पुण्याच्या संतोष पडळकरने सांगलीच्या रणजीत पवारला 10-0 ने हरवत कांस्य पदकावर मोहर उमटवली.
यावेळी अंतिम 70 किलो वजनी गटात माती विभागात कोल्हापूर शहर पहिलवान नितीन पवार व कोल्हापूर जिल्ह्यातील मच्छिंद्र निवंगरे यांच्यात अत्यंत चुरशीची व अतीतटीची लढत झाली. दोघांनीही 4-4 गुण मिळविले. मात्र नियमांनुसार निर्धारित वेळेतील अंतिम गुण हा नितीन पवार याने पटकाविल्याने त्याला विजेता घोषित करण्यात आले व तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. नितीन पवारने यापूर्वी 2017च्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ब्रॉंझपदक पटकाविले होते. महाराष्ट्र केसरी वजनी गटातील ही त्याची पाचवी स्पर्धा असून वस्ताद कृष्णात पाटील यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील संतोष गावडे याने उस्मानाबादच्या लक्ष्मण जाधवला 2-1 ने हरवत ब्रॉंझपदक जिंकले. खुल्या गटातील लढतीत गादी विभागात लातूरच्या सागर बिराजदारने नांदेडच्या विक्रम वडतिले वर 10 गुणांच्या तांत्रिक गुणधिक्याने विजय मिळविला. मुंबईच्या समाधान पाटील याने हिंगोलीच्या दादुमिया मिलानी वर 7 विरुद्ध 2 या गुण फरकाने विजय मिळविला. सोलापूर शहरच्या योगेश पवारने ठाणे जिल्ह्याच्या साहिल पाटीवर 11 विरुद्ध 6 या गुण फरकाने विजय मिळविला. विष्णू खोसे यांचा प्रतिस्पर्धी अनुपस्थित असल्याने त्याला पुढे चाल मिळाली.
पुणे जिल्ह्याच्या मारकडचा विक्रम
पुणे जिल्ह्याच्या सागर मारकड याने राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सलग पाचवे सुवर्ण पटकावले. माती विभागातील 61 किलो गटात पुणे जिल्ह्यातील इंदापूरचा राष्ट्रीय पदक विजेता मारकड याने दुसऱ्या फेरीत रायगडच्या धीरेश पाटीलचा 10-0 असा, तिसऱ्या फेरीत मारकडने वर्धाच्या प्रज्वल सहारे याचा 10-0 असा पराभव केला होता. उपांत्यपूर्व फेरीत मारकडने नाशिकच्या शरद विन्नरला, उपांत्य फेरीत औरंगाबादच्या सौरभ राऊतला चितपट केले होते. अंतिम लढतीचा सामना दोन पुणेकर पैलवानांमध्ये झाला. या गटात गतवर्षी सुवर्णपदक पटकाविलेल्या निखिल कदमलाही मारकडने चितपट करत सुवर्णपदक मिळवित सलग पाचवे सुवर्णपदक पटकावले. यापूर्वी, मारकडने 57 किलो गटात चार सुवर्णपदके जिंकली होती. 61 किलो वजनी गटातील हे पहिलेच सुवर्णपदक आहे. निखिलला मात्र यावर्षी रजतपदकावर समाधान मानावे लागले. निखिलने सांगलीच्या राहुल पाटीलवर 3-2 अशी संघर्षपूर्ण मात करून अंतिम फेरी गाठली होती.
अंतिम निकाल –
70 किलो माती विभाग
सुवर्ण- नितीन पवार (कोल्हापूर शहर)
रजत – मच्छिंद्र निवंगरे (कोल्हापूर जिल्हा)
ब्रॉंझ – संतोष गावडे (सोलापूर)
86 किलो वजनी गट माती विभाग
सुवर्ण – प्रशांत जाधव (सोलापूर)
रजत – आकाश भिंगारे (अहमदनगर)
ब्रॉंझ – संतोष पडळकर (पुणे).