सुवर्णपदकांचा अनभिषिक्त सम्राट

काही माणसे आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टींचा ध्यास घेतात, ज्याची इतिहासाला दखल घेणे भाग पडते. अशाच एका ध्येयाचा ध्यास घेणारा सर्वकालीन महान जलतरणपटू म्हणजे मायकेल फेल्प्स होय. त्याचा जन्म 30 जून 1985 रोजी अमेरिकेत झाला. लहानपणापासून ते अगदी अपेक्षित उंचीवरून वाटचाल करतानाही त्याला संघर्ष करावा लागला. काही न कळण्याच्या वयामध्ये त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. मात्र, कौटुंबिक स्थिती कितीही खालावली असली तरी त्याने पोहणे थांबविले नाही. तो आपल्या आईकडे राहात असे. जिच्याकडून प्रेरणा घेऊन त्याने आपला प्रवास चालू ठेवला.

वयाच्या सातव्या वर्षापासून मायकलने पोहण्यास सुरूवात केली. आपल्या कारकीर्दीच्या आरंभापासूनच त्याने अनेक विक्रम प्रस्थापित करण्यास सुरूवात केली होती. वयाच्या दहाव्या वर्षी राष्ट्रीय विक्रम त्याने केला. पाच ऑलिम्पिक खेळणारा आणि त्यामध्ये अठ्ठावीस पदके जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे. या पदकांपैकी तेवीस सुवर्ण पदके आहेत. 2000 साली झालेल्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या संघात 15 वर्षांचा मायकल फेल्प्स होता. त्यावेळी त्याला पदक मिळू शकले नव्हते. मात्र, 2004 – अथेन्स, 2008 – बीजिंग, 2012 – लंडन, 2016 रिओ या चारही ऑलिम्पिकमध्ये त्याने सुवर्ण पदके मिळवीत ऐतिहासिक कामगिरी केली. 2008 मध्ये त्याने जलतरणाच्या सर्व क्रीडा प्रकारांमध्ये आठ सुवर्ण पदके जिंकून एक वेगळाच विश्‍वविक्रम केला.

असंख्य देश असे आहेत, ज्यांच्याकडे अजुनही बोटावर मोजण्याइतकीच ऑलिम्पिकची सुवर्ण पदके आहेत. मात्र, एकट्या मायकेलकडे 23 सुवर्ण पदके आहेत. जगातील सगळी सुखं त्याच्याकडे असताना त्याचा मार्ग जरासा चुकला! ड्रग्स, वेगात गाडी चालविणे यामुळे त्याला दोन वेळा तुरूंगवास भोगावा लागला आहे. मायकेल फेल्प्स संपला म्हणणारे एकीकडे आणि त्याचा स्वत:चा जगण्याचा संघर्ष दुसरीकडे! इतकेच नव्हे त्याला यादरम्यान आत्महत्येचाही विचार येऊन गेला. विशेषतः आयुष्यातील काही काळ त्याने नैराश्‍य अवस्थेत व्यतीत केला आहे. यातून तो बाहेर आला आणि 2016 च्या ऑलिम्पिकमध्ये पाच सुवर्ण पदके जिंकत यशस्वी कामगिरी करू शकला. आयुष्यात माणसे उगीच मोठी होताना दिसत नाहीत. यामध्ये त्यांचा त्याग, संघर्ष, अचाट तंदुरुस्ती, प्रयत्नातील सातत्य, स्वत:वरील विश्‍वास या सगळ्या गोष्टी महत्वपूर्ण ठरतात. मायकलने त्याच्या ऑलिम्पिकच्या दोन दशकाच्या कारकिर्दीत एकाही दिवशी सरावाला सुट्टी दिली नाही. 365 दिवस दररोज काहीही असले तरी बारा तास सराव हे त्याचे सूत्र ठरलेले होते. बॉब बोवमन हे त्याचे प्रशिक्षक आहेत. त्याच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर त्यांनी त्याला घडविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली.

ज्यामध्ये ते यशस्वी झाले. आज त्यांचा शिष्य ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वाधिक पदकांचा मानकरी ठरलेला आहे. पुढच्या पिढीला घडविण्यासाठी मायकलने स्वत:ची ना नफा ना तोटा या तत्वावर चालणारी संस्था काढली आहे. ज्या माध्यमातून तो भावी जलतरणपटू घडवत आहे. त्याचा If you want to be the best, you have to do things that other people arent willing to do हा विचार घेऊन ही नवीन पिढी नक्कीच सुवर्णमयी मार्गावरून वाटचाल करेल. मोठी स्वप्ने उराशी बाळगत, आपल्या विचारांची क्षितिजे विस्तारित जगणाऱ्या फ्लाईंग फिश मायकेल फेल्प्स या महान खेळाडूस वाढदिवसाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा.

– श्रीकांत येरूळे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.