नवी दिल्ली –ऑगस्ट महिन्यात आयात आणि निर्यात कमी झाल्यामुळे व्यापारातील तूट कमी झाली आहे. मात्र, अशा परिस्थितीतही ऑगस्ट महिन्यामध्ये सोन्याची आयात वाढून 3.7 अब्ज डॉलर इतकी झाली आहे.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये 1.36 अब्ज डॉलरची आयात झाली होती. सध्या जागतिक शेअर आणि चलनबाजारातील अस्थिरतेमुळे सोन्यातील गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे सोन्याची आयात जास्त झाली असल्याचे दिसून येते. सध्या सोन्याचे भाव जास्त आहेत. त्यामुळे दागिन्यासाठी सोन्याची खरेदी कमी प्रमाणात केली जात आहे.
सोन्याची खरेदी जास्त प्रमाणात गुंतवणुकीसाठी केली जात असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. वाणिज्य विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात निर्यात 12 टक्क्यांनी कमी होऊन 22 अब्ज डॉलरची झाली आहे.