पुणे – हॉटेल मालकाची सोनसाखळी हिसकावताना चोरट्यांनी त्याच्यावर गोळीबार केल्याची घटना वेल्हे येथे घडली. यात तीन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील एक छातीत घुसून हॉटेल मालक जखमी झाला. गोळीबारानंतर चोरट्यांनी दुचाकीवरून पळ काढला.
विलास नाथू बोरगे (24, रा. वांजली गाव, ता.वेल्हे) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांना तातडीने धनकवडी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. बोरगे वाजली गावात रस्त्याच्या कडेला छोटेसे चहा व वडापावचे हॉटेल आहे.
रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांच्या हॉटेलमध्ये एका दुचाकीवरून ट्रीपल सीट तिघे आले. त्यांनी सिगरेट खरेदी केली. सिगरेट घेऊन गेल्यावर ते काही मिनिटांतच परतले. त्यांनी थेट बोरगे यांच्या गळ्यातील सोनसाखळीला हात घातला.
मात्र, बोरगे यांनी त्यांना प्रतिकार केला. यात एकाचा हात घट्ट पकडून ठेवला. तो सोडवण्यासाठी दुसऱ्या साथीदाराने त्यांच्या छातीवर गोळी झाडली. एकूण तीन गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन बोरगे यांनी चुकवल्या. घटनास्थळी अपर पोलीस अधिक्षक विजय पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पद्माकर घनवट यांनी भेट दिली.