मुंबई – अक्षय्य तृतीयेला सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. या निमित्ताने या दिवशी सोन्याची खरेदी वाढते आणि दरही वाढतात. मात्र यावेळी अक्षय्य तृतीयेच्या एक दिवस आधीच शुक्रवारी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी साधून आली आहे.
आज मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर, सोन्याचा भाव घसरणीसह 60,381 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उघडला होता. यानंतर सोन्याच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाली. त्यानंतर सोने 61 रुपयांच्या घसरणीसह 60,442 रुपयांपर्यंत पोहचले. गुरुवारी सोने 60,503 रुपयांवर बंद झाले होते. मात्र काही प्रमाणात सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याने सोने खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.
सोन्यासह चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. आज बाजार उघडल्यानंतर चांदीचा भाव 75,303 रुपये प्रति किलो होता. त्यानंतर काही प्रमाणात यात वाढ झाली होती. पण 156 रुपयांनी घसरून चांदी 75,345 रुपये प्रति किलोवर पोहचली. तर काल चांदीचा भाव 75,501 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.
दरम्यान, मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 55,850 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदी 77,400 रुपये प्रति किलो आहे. दिल्लीत 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोने 56,000 रुपये आणि दिल्लीत चांदी 77,400 रुपये प्रति किलो आहे. तर चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोने 55,850 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. चांदी 81,000 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे का शुभ मानतात?
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. यामुळे घरात शांती आणि समृद्धी येते. या दिवशी कोणतीही खरेदी केली तर त्याचे मूल्य वाढते, ते नेहमी तुमच्यासोबत राहते आणि त्यात वाढ होत राहते, असे मानले जाते. यामुळे या दिवशी अनेक लोक सोन्याबरोबरच घर, गाडी यासारख्या वस्तुही खरेदी करतात.