“फेस्टिव्हल ऑफ फ्यूचर’चे उद्घाटन ः युवकांना “स्टार्टअप’साठी मार्गदर्शन
पिंपरी : फेस्टिव्हल ऑफ फ्यूचर हा महापालिकेचा स्तुत्य उपक्रम असून त्याद्वारे शहरातील युवा उद्योजकांना सुवर्णसंधी मिळणार आहे. त्यामुळे तरुणांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांवर विश्वास ठेवून गुंतवणूकदारांनी त्यांच्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक करावी. तसेच युवकांनी आपल्या प्रयत्नात सातत्य ठेवावे, मत पद्मविभूषण व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे दि. 28 व 29 फेब्रुवारी 2020 दरम्यान दोन दिवसीय फेस्टिव्हल ऑफ फ्यूचर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
महापौर उषा ढोरे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. कार्यक्रमाला आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक राजेंद्र गावडे आदी उपस्थित होते.
महापौर उषा ढोरे यांनी मनोगत व्यक्त केले. फेस्टिव्हल ऑफ फ्यूचरच्या माध्यमातून शहरासाठी सुवर्ण युगाची सुरुवात झाली आहे. महोत्सवाच्या माध्यमातून तरुणांना चांगले मार्गदर्शन मिळणार असून युवा उद्योजकांना या माध्यमातून प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आयुक्त हर्डीकर म्हणाले, युवक हे देशाचे भविष्य आहे. फेस्टिवल ऑफ फ्यूचरच्या माध्यमातून महापालिकेला शहरातील स्टार्टअपसची माहिती मिळण्यास मदत होत आहे. या माध्यमातून “स्टार्टअप्स’च्या पाठिशी उभी राहण्याचा महापालिका प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन अण्णा बोदडे यांनी केले, आभार विलास मडीगेरी यांनी मानले.