कन्नूर (केरळ) – केरळच्या कन्नूर जिल्ह्यात शुक्रवारी मनरेगा मजुरांचा एक गट पावसाचे पाणी साठवण्यासाठी खोदकाम करत असताना त्यांना न्या-चांदीचा खजिना जमिनीत पुरलेला दिसून आला. वास्तविक, उत्खननादरम्यान त्यांना एक मातीचे भांडे सापडले ज्यामध्ये सोन्या-चांदीची नाणी ठेवण्यात आली होती. यानंतर शनिवारी सकाळी याच ठिकाणाहून आणखी पाच चांदीची नाणी आणि दोन सोन्याचे दागिने मिळून आले.
या मौल्यवान वस्तू चेमगाई पंचायतीच्या परीपाई सरकारी एलपीमध्ये जमा करण्यात आल्या होत्या. शाळेजवळील एका खासगी मालमत्तेत हे खोदकाम सुरु होते. पुरातत्व विभागाने केलेल्या प्राथमिक तपासणीत या पुरातन वास्तू सुमारे 200 वर्षे जुन्या असल्याचे समोर आले आहे. कामगारांना सुरुवातीला हा बॉम्ब वाटला आणि त्यामुळे घाबरून त्यांनी तो फेकून दिला. मात्र भांडे फुटल्याने तेथे उपस्थित सर्व कामगारांना धक्काच बसला.
या मातीच्या घटामध्ये 17 मोत्यांचे मणी, 13 सुवर्णपदके, 4 पदके ‘कशुमाला’ या पारंपरिक दागिन्यांचा भाग, कानातले आणि चांदीची नाणी सापडली. एका मजूराने सांगितले की, हे सोने-चांदी पाहून आम्हाला आश्चर्य वाटले आणि त्याचे काय करायचे ते समजत नसल्याने आम्ही पंचायत अध्यक्षांना याबाबत माहिती दिली. यानंतर पंचायत अधिकाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर तळीपारंबा पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व मुद्देमाल ताब्यात घेऊन तळीपारंबा न्यायालयात हजर केले.
त्या ठिकाणी खजिना आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी पुरातत्व विभाग या शोधाचा सविस्तर तपास सुरू करू शकतो. त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी सापडलेल्या वस्तू आपल्या ताब्यात घेण्याचा निर्णयही विभागाने घेतला आहे. ज्या ठिकाणाहून पुरातन वास्तू जप्त करण्यात आल्या त्या ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्व नाही, त्यामुळे या वस्तू खाजगी संग्रहाचा भाग असू शकतात. मात्र, आम्ही तपासानंतरच निष्कर्ष काढू शकतो.