नवी दिल्ली – जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आल्यामुळे भारतीय सराफात गुरूवारी सोने आणि चांदीच्या दरात ( Gold and silver prices ) बरीच घट नोंदली गेली. डॉलर बळकट होत असल्यामुळे सोन्याच्या दरात घट होत असल्याचे काही विश्लेषकांनी सांगितले. ( Gold prices fall sharply )
दिल्ली सराफात सोन्याचे दर 369 रुपयांनी कमी होऊन 48,388 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तर चांदीचे दर 390 रुपयांनी कमी होऊन 64,534 रुपये प्रति किलो झाले. जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी होऊन 1,842 डॉलर प्रति औंस तर चांदीचे दर 25.21 डॉलर प्रति औंस झाले.
अमेरिकेतील परिस्थिती सुरळीत होत असल्यामुळे डॉलर वधारल्याने जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी झाले असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले. मात्र जागतिक आर्थिक आणि करोनाविषयक परिस्थिती आणखी पूर्वपदावर आली नसल्यामुळे कमी अधिक प्रमाणात सोने खरेदी चालू राहील असे बऱ्याच विश्लेषकांना वाटते.
सोन्याचे दर 50 हजार रुपयांच्या खाली असल्यानंतर दीर्घ पल्ल्याच्या गुंतवणूकदारांसाठी खरेदी योग्य ठरेल असे हे काही विश्लेषक सुचवितात.